छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : मूळ जमीन मालक असलेल्या पुरुषाच्या जागी बनावट महिलेस उभे करून जमिनीची इसार पावती करण्यात आली. तसेच इतर दोन महिलांना उर्वरित जमिनीचे मालक दाखविण्यात आले. या व्यवहारात दोघांची ७० साख रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना करमाड येथे घडली.
याप्रकरणी सराईत गुन्हेगार राजू ऊर्फ कचरु विठ्ठल जाधव (रा. पाल, ता. फुलंब्री) यास पोलिसांनी शुक्रवारी (दि.३०) हर्सूल टी पॉइंट येथून बेड्या ठोकल्या. वैशाली राजू जाधव (३०,रा. पाल) हिला यापूर्वीच अटक करण्यात आली असून ती कोठडीत आहे.
याप्रकरणी संतोष शिवाजी वैद्य (रा. सातारा परिसर) यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार, त्यांच्या ओळखीचा ब्रोकर राजू जाधव हा त्यांच्याकडे आला. करमाड येथील गट क्र. ३० मधील ३ हेक्टर ८४ आर जमीन विक्रीसाठी असल्याचे सांगितले. ही जमीन रायचुरी ब्रम्हरंभा रंगदास (४४, रा. घोटी, जि. नाशिक), रायचुरी सायन्ना रंगदास (६३, रा. हैदराबाद) यांची असल्याचे सांगून ५० लाख रुपये घेत जमिनीची इसार पावती व करारनामा करून दिला. ब्रोकर राजू जाधव याच्यामार्फत शारदा रायचुरी रंगदास (४७, रा. बंगळूर) हिने मनोज गटकाळ (रा. पाचोड) यांना ७५ आर जमीन विक्रीचा व्यवहार ठरवून २० लाख रुपये घेत इसार पावती करून दिली.
इसार पावती व करारनामा करूनदेखील खरेदीखत करून देत नसल्याने आरोपींनी फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले. जमिनीचे मूळ मालक सायन्ना रायचुरी हे पुरुष असताना इसार पावती करारनामा करताना महिलेस बोगस मालक दाखविण्यात आले. इतर दोन महिलांना उर्वरित जमिनीचे बनावट मालक दाखविण्यात आले.












